शनिवार, ११ एप्रिल, २०१५

नाशिक जिल्ह्यातील तहसीलदार निलंबन प्रकरण

मित्रहो.. ,

    नाशिक जिल्ह्यातील सात तहसिलदार निलंबित करण्याच्या  कालच्या विधानभवनातील घोषणेपासुन तहसिलदार व नायब तहसिलदार संवर्गात कमालीची  अस्वस्थता पसरलेली होती.
     तथापि याबाबत नाशिक विभागातील विविध पदाधिकारी याबाबत सत्यता मांड्ण्यासाठी प्रचंड मेहनत घेत होते.
    संघटनेचे  राज्याचे सचिव श्री बाळासाहेब वाघचौरे व नाशिक विभागाचे इतर पदाधिकारी यांनी मा. महसुल मंत्री महोदयांशी कालच चर्चा केली होती.  त्यानुसार जोपर्यंत सदर प्रकरणाची संपुर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत तहसिलदारांना निलंबीत केले जाणार नाही असे आश्वासन मा. महसुल मंत्री महोदय यांनी दिले होते.  आज संघटनेच्या पदाधिका-यांनी विधानपरिषद उपसभापती मा.श्री. वसंत डावखरे सर यांच्याही निदर्शनास हि बाब आणुन दिली त्यानुसार त्यांनी सुध्दा स्वत: च्या लेटर हेडवर मा. मंत्री,  अन्न व नागरी पुरवठा यांना लेखी पत्र देऊन सदर तहसिलदारांवर चौकशीशिवाय कारवाई करणे योग्य होणार नाही  त्यामुळे त्यांचे विनंतीचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा असे म्हटले आहे. 

    तसेच आज नाशिक जिल्ह्याच्या मा. पालकमंत्री महोदयांची सुध्दा भेट पदाधिका-यांनी घेतली आणि  यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्याही निदर्शनास आणुन दिल्या.
      मा. ना. गिरीश बापट, मंत्री अन्न व नागरी पुरवठा यांचीसुध्दा आज संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेतली. त्यानुसार सदर प्रकरणाची त्रयस्थ आय.ए.एस. अधिका-यमार्फत चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मा. मंत्री  महोदयांनी दिले.
    एकंदरीत जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांच्या चुकीच्या ब्रिफींग मुळे सदर प्रकार घडलेला असल्याचे स्पष्ट होत आहे.
  तथापि संघटनेचे अत्यंत जागरुक असलेले पदाधिकारी श्री बाळासाहेब वाघचौरे, शशिकांत मंगरुळे तसेच नाशिक विभागातील इतर पदाधिकारी या सर्वांनी गेल्या दोन दिवसांपासुन विलक्षण धावपळ करत यासंदर्भातील सत्य परिस्थिती शासनापर्यंत पोचविली.. तसेच महासंघाचे मा. ढाकणे साहेब , मुंडावरे साहेब, महाजन साहेब यांचे सुध्दा अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. संघटना त्यांची आभारी आहे.

  तसेच संघटनेची बाजु संपुर्ण समजुन घेऊन प्रथम चौकशी आणि नंतरच दोषींवर कारवाई असे आश्वासन  मा. महसुल मंत्री, मा. पुरवठा मंत्री यांनी दिल्याबद्दल त्यांचे शतश: आभार.!!!

  मा. पालकमंत्री नाशिक तसेच मा. उपसभापती, विधानपरिषद  यांनी सत्य परिस्थिती जाणुन घेऊन आपल्याप्रती दाखवलेल्या आस्थेबद्द्ल त्यांचे विशेष आभार..!!

    दुसरा विषय असा की  खामगाव जि. बुलडाणा येथील तहसिलदार श्री टेंभरे यांना सुध्दा निलंबित केले नसुन प्रकरणाची संपुर्ण चौकशी करुनच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या विषयात सदस्यांनी फार घाबरुन जाण्याचे कारण नाही.
   

      मित्रहो, या सर्व घडामोडींमधुन संघटना एक संदेश देऊ इच्छीते .  तो म्हणजे सर्वच विषय हे आंदोलनाने अथवा बहिष्काराने सोडवायचे नसतात.  तर वैधानिक मार्गानेसुध्दा आपण शासनाकडे आपले म्हणणे मांडु शकतो आणि शासनसुध्दा त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत असते. आपल्या संघटनेची  भुमिका ही शासनाशी कायम सहकार्याचीच असुन बंद , बहिष्कार किंवा आंदोलने यापेक्षा वैधानिक मार्गावरच संघटनेचा विश्वास आहे हेच आपण शासनाच्या वारंवार निदर्शनास आणुन देण्याचा प्रयत्न करत आहोत.. सबब संघटनेचे महत्व कायम आहे.

      इतर विभागाची कामे जी महसुल विभागाद्वारे केली जातात त्यासंदर्भात पुढील महिन्यात राज्यस्तरीय बैठक आयोजीत केली जाणार असुन त्याबाबत संघटना पुढील दिशा ठरविणार आहे.
    
                  धन्यवाद..!!

                     आपला
                   सुरेश बगळे.
                    कार्याध्यक्ष ,
        म.रा. तह. ना तह संघटना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा